आजीबाईंच्या बटव्यातील काही घरगुती उपाय......

आजीबाईंच्या बटव्यातील काही घरगुती उपाय......


     घरामध्ये आजी असली, की आरोग्याच्या बाबतीतले सल्ले सतत ऐकायला मिळत असतात. या मधील कितीतरी सल्ले आपण, ‘जुन्या गोष्टी झाल्या या‘, असे म्हणून दुर्लक्षित करतो, पण आजच्या काळामध्ये देखील या सल्ल्यांमध्ये तथ्य असल्याचे , किंवा घरगुती उपचारांमध्ये आजार बरे करण्याचे सामर्थ्य असल्याचे आता वैज्ञानिक देखील मान्य करतात. उन्हाळ्याच्या ऋतूचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे आंबे. पण आंबे खाण्याआधी पाण्यामध्ये काही काळ बुडवून ठेऊन मग खावेत असे म्हटले जाते. याचे कारण असे, की आंबा प्रकृतीने उष्ण असून, त्याच्या अति सेवनाने अंगावर उष्णतेचे फोड येऊ शकतात. त्यामुळे आंबे खाण्यापूर्वी काही काळ पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यास, त्यावरील चिक निघून जातो, व त्याची उष्णता देखील कमी होते. आंब्यामध्ये अ आणि क जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर आहे. रक्तशुद्धी आणि आतड्यांच्या आरोग्याकरिताही आंबे अतिशय फायदेशीर आहेत.

1.

      सकाळी उठल्यानंतर लगेच दोन लास पाणी पिण्याचा सल्ला आपल्याकडे सर्वच वडीलधारी मंडळी देत आली आहेत. पाणी प्यायल्याने शरीरातील घातक द्रव्ये लघवीवाटे बाहेर टाकली जातात, व शौचास साफ होते. त्यामुळे शरीरामध्ये स्फूर्ती येऊन मन प्रसन्न राहते. पाणी प्यायल्याने आतड्यांची स्वच्छता होते, व किडनीचे आरोग्य चांगले राहते. तसेच बद्धकोष्ठाची तक्रार उद्भवत नाही.

2.

       जेवणामध्ये हळदीचा वपर करण्याची प्रथा आपल्याकडे पूर्वापार चालत आली आहे. हळद प्राकृतिक अँटी सेप्टिक आणि अँटी बॅक्टेरियल आहे. शरीरातील घाव हळदीच्या सेवनाने ठीक होऊ शकतात. मधुमेहींकरिता हळद विशेष गुणकारी आहे. रक्तशुद्धीसाठी देखील हळद उपयोगी आहे. हळदीमध्ये सूज कमी करणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे गुण आहेत. त्यामुळे रोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधामध्ये एक चिमुट हळद घालून पिणे आरोग्यास लाभकारक समजले जाते.

3.

        केसांना तेल लावून मालिश करण्याची पद्धत आता जुनी होत चालली आहे. त्याऐवजी महागडे हेअर प्रोडक्ट्स आणि कंडीशनर्स यांच्यावर खर्च करणे आता जास्त आढळू लागले आहे. पण खोबरेल तेल हे नैसर्गिक कंडीशनर असून, त्याच्या वापराने केसांना नैसर्गिक रूपाने आर्द्रता मिळते. त्यामुळे केस मुलायम, चमकदार तर होतातच, शिवाय केसांच्या मुळांना पोषण मिळून केसगळती कमी होते. खोबरेल तेलामध्ये थोडेसे नारळाचे दूध मिसळून ते केसांना लावल्यास फायदा होतो.

4.

        त्वचेच्या आरोग्यासाठी कडूनिम्बाचा वापर फार प्राचीन काळापासून चालत आला आहे. यामध्ये असलेले निम्बडीन सल्फर युक्त असून, त्यामुळे त्वचेचे अनेक विकार बरे होतात. मुरुमे, पुटकुळ्या, त्वचेला सतत सुटणारी खाज, खरुज, आणि सोरायसिस सारखे विकार देखील कडूनिंबाच्या वापराने बरे होण्यास मदत होते. पण जर त्वचा जास्त संवेदनशील असेल, तर मात्र कडूनिम्बाचा वापर करताना काळजी घ्यावी.

No comments

Powered by Blogger.